येस न्युज मराठी नेटवर्क । पूजा चव्हाण प्रकरणातून अखेर संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी राठोड यांनी सपत्नीक भेट घेतली. दोघांमध्ये झालेल्या चर्चेनंतर राठोडांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राठोड यांनी माध्यमांसमोर येत राजीनामा देण्यामागील भूमिका स्पष्ट केली.
पूजा चव्हाण प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी माध्यमांशी संवाद साधला. “मी माझा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आमच्या बंजारा समाजातील तरुणी पूजा चव्हाण हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावरून विरोधी पक्षाने सोशल मीडियाच्या माध्यमातून घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. माझी, माझ्या समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मला राजकारणातून उठवण्याचाही प्रकारही झाला. गेल्या तीस वर्षात सामाजिक, राजकीय क्षेत्रात मी जे काम केलं आहे, ते उद्ध्वस्त करण्याचं काम झालं आहे. मी आधीही हे बोललो. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, हीच माझी मागणी आहे. याचा तपास व्हावा, अशीच माझी मागणी आहे. मी बाजूला राहून या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी भूमिका आहे. सत्य बाहेर यावं. मी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनाही बोललो आहे. त्यामुळेच मी राजीनामा दिला आहे,” असं संजय राठोड यांनी स्पष्ट केलं.