येस न्युज मराठी नेटवर्क । भारतीय शेअर बाजाराची शुक्रवारची सुरूवातच प्रचंड पडझडीने झाली असून हा काळा शुक्रवार ठरतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे. शेअर बाजाराचे व्यवहार सकाळी सुरु झाल्या झाल्या एक हजारांहून अधिक अंकाची पडझड झाल्याचे चित्र पहायला मिळालं. जागतिक बारपेठेमधील घसरण या पडझडीला कारणीभूत असल्याचं सांगण्यात येत आहे. सकाळी ९ वाजून १८ मिनिटांनी शेअर बाजार सुरु झाला तेव्हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधील सेन्सेक्स ५० हजार १८४.६० वर होता. काल बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स ५१ हजारांवर होता. दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी हा निर्देशांकही २८३.४५ अंकांनी घसरला आणि १४.८३५.४५ वर स्थिरावला. कालच्या तुलनेत सेन्सेक्समध्ये १.६८ टक्के तर निफ्टीमध्ये १.८७ टक्क्यांची घसरण पहायला मिळाली. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स एक हजार अंकांनी घसरला होता.
आज राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयकडून भारताच्या जीडीपीसंदर्भातील आकडेवारी जाहीर केली जाणार आहे. तिसऱ्या तिमाहीमध्ये म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर २०२०-२१ मध्ये जीडीपीची किती वाढ झाली यासंदर्भातील आकडेवारी आज जाहीर होणार असल्याने त्यावरही बाजारामधील चढ उतार अवलंबून असेल. मागील दोन तिमाहींमध्ये अर्थव्यवस्थेच्या वाढीवर अत्यंत प्रतिकूल परिणाम झाला होता.मात्र अनलॉक झाल्यानंतर म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत जीडीपीची वाढ आधीच्या दोन तिमाहीपेक्षा चांगली असेल अशी अपेक्षा आहे. अर्थात शेअर बाजारावर जागतिक अर्थव्यवस्थेचे पडसादही दिसून येत असल्यामुळे पडझड झाल्याचे सांगितले जात आहे. आशियामधील सर्वच शेअर बाजारांमध्ये पहिल्या सत्रामध्ये घसरण पहायला मिळाली आहे. यामुळे गुंतवणुकदारांचे मोठं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे.