मुंबई : गेल्या काही दिवसांत काँग्रेसचे अनेक दिग्गज नेत्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. त्यात आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाही समावेश आहे. काँग्रेसच्या आमदारांना निधी कमी दिला जात असल्याची चर्चा सुरु आहे. त्यावर काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे, अशा शब्दात नाना पटोले यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आठवण करुन दिली आहे.
काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे. जिथे कमी तिथे बोललं तर काय चुकलं. समान वाटप व्हावं ही आमची मागणी आहे, असं नाना पटोले म्हणाले. यापूर्वी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही काँग्रेस आमदारांना मिळणाऱ्या निधीबाबत नाराजी व्यक्त केली होती.
देशातील सगळे टोल बंद करा- पटोले
जनतेची डबल लूट सुरु आहे. रस्त्यासाठी पेट्रोलवर सेस घेतला जातो आणि टोलही आकारला जातो. देशातील सगळे टोळ तात्काळ बंद करावे अशी मागणीही नाना पटोले यांनी केली आहे. 2015 मध्ये राज्यातील फडणवीस यांच्या सरकारच्या काळात 25 टक्के पेट्रोल, तर डिझेलमध्ये 21 टक्के वाढ केली. त्यांचे सरकार जाईपर्यंत 11 रुपयांची वाढ केली. पण महाविकास आघाडी सरकारने फक्त 1 रुपयाची वाढ केल्याचा दावा पटोले यांनी केलाय.