मुंबई : संजय राठोडच पूजा चव्हाणचे मारेकरी असून त्यांच्या मुसक्या आवळल्याच पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिली आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव आल्यानंतर सुमारे 14 दिवस नॉट रिचेबल असलेले संजय राठोड आज समोर आले. पूजा चव्हाण प्रकरणात अतिशय घाणेरडं राजकारण करण्यात आलं. परंतु सोशल मीडियातून आणि इतर मार्गाने माझी आणि बंजारा समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. चौकशीतून सत्य समोर येईल, अशी प्रतिक्रिया यावेळी संजय राठोड यांनी दिली.
यावर बोलताना भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या की, “या सगळ्या बलात्काऱ्यांना पाठिशी घालण्यासाठी मंत्र्यांची चढाओढ सुरु आहे. तू जास्त बोलतो की मी जास्त बोलतो. हे चित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रासाठी अजिबातच साजेसं नाही. त्यामुळे सरकारने महिला सुरक्षेचे, महिला सक्षमीकरणाचे नारे बाजूला ठेवून अॅक्शन मोडमध्ये येण्याची गरज आहे. पूजा चव्हाणचा मारेकरी संजय राठोड यांच्या मुसक्या ताबडतोब आवळल्या पाहिजे, ही आमची मागणी आहे.”