पंढरपूर : अपघातामुळे अपंगत्व आलेल्या सोलापूर येथील डॉ.ज्ञानराज राजकुमार होमकर यांना श्री विठ्ठलाची दर्शन घेण्याची इच्छा होती. परंतु ये स्ट्रेचरवर होते.. त्यांची ही ईच्छा कशी पुर्ण होणार या विवंचनेत संपुर्ण होमकर कुटुंबिय होते. मात्र विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी विठ्ठल जोशी यांच्या प्रयत्नामुळे त्यांना स्ट्रेचरवरूनच विठ्ठलाचे दर्शन घडले.
सविस्तर माहिती अशी की, सोलापूर मधील बाळीवेस येथील ज्ञानराज राजकुमार होमकर यांनी वैद्यकीय शिक्षण पुर्ण करुन डॉक्टर बनण्याचे स्वप्न बाळगले होते. त्यानुसार त्यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेवून शिक्षण पुर्ण करीत असताना अखेरच्या वर्षी कॉलेजमध्ये एका कार्यक्रमा दरम्यान नृत्य करताना पाय घसरुन पडले. यावेळी ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार करण्यात आले व अद्याप ही करण्यात येत आहेत. डॉ. ज्ञानराज होमकर यांचे मानेपासूनचे खालचे अवयव हात, पाय निकामी अवस्थेत आहेत. तर मानेपासून वरील अवयव डोळे, कान, डोके सुखरुप कार्यरत आहेत.
मागील सात वर्षापासून म्हणजेच २०१३ पासून ज्ञानेश होमकर हे अंथरुणावर पडून आहेत. तर दोन वर्षांपासून व्हीलचेअरचा आधार घेत जीवन जगत आहेत. ज्ञानराज यांचा मोठा भाऊ इंजिनिअर आहे. तर वडील मेडिकल चालवतात. आई गृहिणी आहे. वडील राजकुमार होमकर हे स्वत: वारकरी असून ते सोलापूरातील नामदेव मंदिरात पुजारी आहेत. अशा धार्मिक वातावरणातील घरात वावरल्याने डॉ. ज्ञानराज यांना ही आध्यात्मांचा लळा आहे. यामुळे त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली.
त्यानुसार वडील राजकुमार होमकर यांनी डॉ.ज्ञानराज यांना रुग्णवाहिकेतून येथे आणले. पंढरीत आल्यानंतर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांना दर्शनाची विनंती केली. मंदिरात श्री विठ्ठल रुक्मिणीचा पोषाख बदलतेवेळी दुपारच्या वेळी भाविकांची गर्दी कमी असते. या वेळेचा लाभ घेत जोशी यांनी डॉ.ज्ञानराज यांना स्ट्रेचर वरुन मंदिरात आणत विठ्ठलाचे दर्शन घडवून आणले. त्यामुळे डॉ.ज्ञानराज यांची श्री विठ्ठल दर्शनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘विठ्ठल रुपी विठ्ठलच’ धावून आल्याचा प्रत्यय आल्याची भावना दर्शना नंतर होमकर कुटुंबियांनी व्यक्त केली.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी एका सामान्य भाविकाला एका विनंतीवरुन विठ्ठल दर्शन घडवून आणले त्यामुळे आम्ही होमकर कुटुंबिय कृतार्थ झालो.
- राजकुमार होमकर (वडील)
डॉ.ज्ञानराज होमकर यांची स्टे्रचरवरची अवस्था बघितली. त्यानुसार मंदिरात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पोषाख बदलण्याच्या वेळी गर्दी कमी असल्याने स्ट्रेचरवरच त्याच वेळी मंदिरात त्यांना आणणे शक्य झाले. त्यामुळे विठ्ठल दर्शनाची त्यांची इच्छा पुर्ण झाली.
- विठ्ठल जोशी, कार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती