येस न्युज मराठी नेटवर्क : राज्यात पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. गेल्या दोन आठवड्यांत नवीन बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्याबाबत माहिती देतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येत्या काळात कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्यता बोलून दाखवली आहे.
रविवारी राज्यात ४ हजारावर नवीन बाधितांची भर पडली आहे. विशेषत: ग्रामीण भागात करोना रुग्णवाढ दिसून येत आहे. त्यावर बोट ठेवत अजित पवार आणि राजेश टोपे या दोघांनीही कठोर निर्णय घेण्याचे संकेत दिले.उद्धव ठाकरे यांना मी उद्या भेटणार आहे. या बैठकीत करोनासंदर्भात कदाचित कठोर निर्णय घेतले जातील, असेही पवारांनी नमूद केले. राजेश टोपे यांनी तर यावेळी थेट लॉकडाऊनचेच संकेत दिले. करोना संसर्गजन्य परिस्थितीत नागरिकांनी नियम पाळणे आवश्यक आहे, अन्यथा लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय उरेल आणि लोकहितासाठी तो कठोर निर्णय घेतला जाईल, असे टोपे यांनी ठामपणे सांगितले.