येस न्युज मराठी नेटवर्क : केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. ‘हम दो, हमारे दो’ म्हणत चार लोक देशाला चालवत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. या आरोपाचा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी समाचार घेतला. दोन लोक पार्टीची काळजी घेतायेत आणि आणखी दोन लोक आहेत ज्यांची काळजी आम्हाला घ्यायची आहे, असं म्हणत अर्थमंत्र्यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं.
सर्वसाधारण अर्थसंकल्प क्रोनी कॅपिटालिस्ट केंद्री असल्याचा आरोप करत विरोधकांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विरोधकांचा आरोप खोडून काढला. सीतारामन यांनी आकडेवारी वाचून दाखवत विरोधकांचा आरोप तथ्यहीन असल्याचा दावा केला. लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या,”अर्थसंकल्प क्रोनी कॅपिटालिस्ट केंद्रीय असल्याचा हा विरोधकांचा आरोप चुकीचा असून, गरीबांना मदत करणारा आहे. अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीला गती मिळणार असल्याचा दावा सीतारामन यांनी केला.