येस न्युज नेटवर्क । संसद अधिवेशनादरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत भारत – चीन तणावासंबंधी माहिती दिली. दोन्ही पक्षांत वेगवेगळ्या स्तरांवर चर्चा सुरू असल्याचे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) शांततापूर्ण स्थिती कायम राखण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. भारताने नेहमीच द्विपक्षीय संबंध कायम ठेवण्याचा आग्रह केला आहे, असंही यावेळी संरक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले.
एलएसीवर चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. देशाच्या रक्षणासाठी आपल्या जवानांनी बलिदान दिलं. आम्हाला विश्वास आहे की हा वाद चर्चेद्वारे सोडवला जाऊ शकतो. त्यामुळेच चीनशी वाटाघाटी सुरू असल्याचं संरक्षण मंत्र्यांनी संसदेत म्हटलंय.आम्ही कुणाला एक इंचही जमीन देणार नाही, हे आमचं सरकार स्पष्ट करू इच्छितं, असंही आश्वासन राजनाथ सिंह यांनी दिलंय.पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिणेस सैन्य मागे घेण्याचं दोन्ही देशांकडून मान्य करण्यात आलं आहे. कालपासून सीमेवर सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असा दावाही राजनाथ सिंह यांनी केलाय.सैन्याकडून माघार घेतल्यानंतर उर्वरित प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा सुरू आहे. करारानंतर ४८ तासांच्या आत दोन्ही देशांचे कमांडर एकमेकांची भेट घेतील, असंही त्यांनी म्हटले .देशाच्या सार्वभौमत्वाच्या मुद्दयावर संपूर्ण सभागृह एकत्र उभे आहे, असा विश्वासही राजनाथ यांनी व्यक्त केला.