सोलापूर : श्री सिद्धरामेश्वर हा आपल्या सर्वांचा श्रद्धेचा विषय आहे. सोलापूरच्या पावनभूमीत श्री सिद्धरामेश्वर युग अवतरले. श्री सिद्धरामेश्वर यांची कृपादृष्टी अखिल मानव जातीवर आहे. त्यांचे कार्यकर्तृत्व समाजासमोर आणणे गरजेचे आहे. त्याकरिता त्यांच्याबद्दल अधिकाधिक साहित्य प्रकाशित व्हावे असे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. शे. दे. पसारकर यांनी केले.
श्री सिद्धेश्वर देवस्थानच्यावतीने जेष्ठ पंच सोमशंकर देशमुख यांनी प्रकाशित केलेल्या ‘चरित्रनायक’ व ‘सोलापूरचे परंपरागत वतनदार देशमुख घराणे’ या दोन पुस्तकांच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर जेष्ठ पंच नीलकंठप्पा कोनापुरे, संयोजक सोमशंकर देशमुख, लेखिका लता अकलूजकर, शांता मरगुर उपस्थित होते.
यावेळी इतिहास लेखिका डॉ. लता अकलूजकर, शांता मरगुर व नीलकंठप्पा कोनापुरे यांनीही मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमास प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर, सिद्धेश्वर बमणी, ऍड. आर. एस. पाटील, काशिनाथ दर्गोपाटील, बसवराज अष्टगी, गिरीश गोरनळ्ळी, महेश अंदेली, डॉ. अनिल सर्जे, राजशेखर बुरकुले, संतोष पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमशंकर देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन काशिनाथ आकाशे यांनी केले तर आभार रवींद्र कबाडे यांनी मानले.
सोमशंकर देशमुख यांच्या घरी असलेला योगदंड बाराव्या शतकातील : इतिहास लेखिका लता अकलूजकर
श्री सिद्धरामेश्वर यांचा काळ आणि या योगदंडाचा काळ एकच आहे सोमशंकर देशमुख यांनी सांगितले. तेंव्हा माझ्या सांगण्यावरून देशमुख यांनी फ्लोरिडा येथील पुरातत्त्व विभागाच्या प्रयोगशाळेत कार्बन 14 या शास्त्रोक्त पद्धतीने कालमापन करून घेतले. त्यांच्या अहवालावरुन योगदंडाचा कालखंड हा 12व्या शतकातील ठरतो. या प्रयोगशाळेच्या प्रमाणपत्रावरून हा योगदंड श्री सिद्धरामेश्वर यांचा समकालीन आहे हे सिद्ध होते.