वॉशिंग्टन: भारतात राजधानी दिल्लीच्या सीमेवर मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटत आहेत. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आदी देशांतील राजकीय नेत्यांनंतर आता सेलिब्रेटींनीही पाठिंबा दर्शवण्यास सुरुवात केली आहे. हॉलिवूड पॉप स्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवल्यानंतर आता पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गनेही पाठिंबा दर्शवला आहे.
रिहानाच्या ट्विटमुळे आंतरराष्ट्रीय मंचावर शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर मोठी चर्चा सुरू झाल्याचे चित्र आहे.रिहानाच्या ट्विटनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असलेले सेलिब्रेटी, संस्था यांनीही ट्विट केले. पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गनेही भारतातील शेतकरी आंदोलनासोबत भ्रातृभाव व्यक्त केला.रिहानाच्या ट्विटनंतर आंतरराष्ट्रीय संस्था ह्युमन राइट वॉच, आंतरराष्ट्रीय पातळीवरील इंटरनेट वापराच्या अधिकारासाठी कार्यरत असणाऱ्या संस्था, अमेरिकन मॉडेल अमांडा सेर्नी यांच्यासह अनेक नामवंत व्यक्तींनीदेखील ट्विट केले आहेत.