मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा होत आहे. यंदा उदयास आलेल्या तिसऱ्या आघाडीकडूनही उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील परिवर्तन आघाडीने आपल्या 8 उमेदवारांची नावे जाहीर केली असून स्वाभिमानीच्या 2 उमेदवारांची नावे उद्या 22 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहेत.
दरम्यान, परिवर्तन महाशक्तीकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत आमदार बच्चू कडू यांचं नाव असून बच्चू कडू यांना अचलपूर मतदारसंघातून प्रहारच्या चिन्हावर उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. व्हिजन महाराष्ट्र म्हणून बाकीच्या राज्याने आदर्श घ्यावा असं कोणताही पायाभर आराखडा आपल्याकडे नाही, म्हणून परिवर्तन महाशक्तीची निर्मिती झाल्याचं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं. तसेच, परिवर्तन महाशक्ती आघाडीला चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या असून आज आम्ही महाशक्तीचे उमेदवार जाहीर करत असल्याचे सांगत आमदार बच्चू कडू यांनी स्वत:ची उमेदवारी जाहीर केली. परिवर्तन महाशक्ती वैचारिक परिवर्तन आहे, आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. तर, महायुतीतील एक जण बाहेर जाण्याची शक्यता आहे, असा दावाही आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. दरम्यान, भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून अचलपूर मतदारसंघातून प्रवीण तायडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
परिवर्तन महाशक्तीचे घोषित करण्यात आलेले उमेदवार
- अचलपूर – बच्चू कडू – प्रहार
- रावेर – अनिल चौधरी – प्रहार
- चांदवड – गणेश निंबाळकर – प्रहार
- देगलूर – सुभाष सामने – प्रहार
- ऐरोली – अंकुश कदम- महाराष्ट्र स्वराज पक्ष
- हदगाव हिमायतनगर – माधव देवसरकर – महाराष्ट्र स्वराज्य पक्ष
- हिंगोली – गोविंदराव भवर – महाराष्ट्र राज्य समिती
- राजुरा – वामनराव चटप – स्वतंत्र भारत पक्ष