सोलापूर – मा. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रारूप प्रभाग रचना दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती. या प्रारूप प्रभाग रचनेचा एकत्रित नकाशा व स्वतंत्र नकाशा नागरिकांसाठी महापालिका मुख्यालयातील कौन्सिल हॉल येथे पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला होता.
मा. शासनाच्या निर्देशानुसार प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांना हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ३ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२५ दुपारी ३.०० वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीत एकूण ३८ हरकती व सूचना प्राप्त झालेल्या आहेत.
सदर हरकती व सूचनांवर सुनावणी घेण्यासाठी जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी मा. मोनिका सिंह, अप्पर जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केले आहे. सुनावणी दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता जिल्हा नियोजन भवन, सोलापूर येथे होणार असून, ज्यांनी प्रारूप प्रभाग रचनेवर हरकत दाखल केली आहे त्यांनी दिलेल्या वेळेच्या अर्धा तास आधी सुनावणीच्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यानंतर अंतिम प्रभाग रचना दिनांक २३ ते २९ सप्टेंबर २०२५ दरम्यान निश्चित करून नगर विकास विभागामार्फत मा. राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर ९ ते १३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत अंतिम अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल.