येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहरात बुधवारी आलेल्या अहवालानुसार ३३८ नवीन व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये २०२ पुरुष आणि १३६ महिला आहेत. मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात २२ जणांचा सोलापूर शहरात मृत्यू झाल्याचे महापालिकेच्या अहवालात म्हटले आहे . सिव्हिल रुग्णालयात आठ , रेल्वे रुग्णालयात ३, अश्विनी , मार्कंडेय आणि सी .एन. एस. या तीन रूग्णालयात प्रत्येकी दोन त्याचप्रमाणे केअर, गंगामाई ,स्पर्श, जीशान, धनराज गिरजी अशा पाच रुग्णालयात प्रत्येकी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. सोलापूर शहरातील चाळी, विविध पेठा, झोपडपट्ट्या आणि अपार्टमेंट्स अशा २०७ ठिकाणी नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. २४ तासात २२ जणांचा मृत्यू होणे ही सोलापूर महापालिका प्रशासनाच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरली आहे. ऑक्सीजन बेडची कमतरता आणि रेमडेसिवीर इंजेक्शन अद्याप उपलब्ध होत नसल्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे.