पुणे,सातारा, सोलापूर, नाशिकचे १७ हजार जण हाेणार सहभागी
सोलापूर : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अर्थात एमएसएससीने रद्द केलेली राज्य राखीव दलातील, एसआरपी जवानांची भरती २० ऑगस्टपासून सुरू होणार आहे. मार्च -एप्रिल २०२० दरम्यान ही भरती केली जाणार होती. पण कोरोनामुळे स्थगित केली होती. राज्यभरात सात हजार जागांसाठी १ लाख ३३ हजार ६९३ युवक यामध्ये सहभागी होतील. नऊ जिल्ह्यांतील एसआरपीएफ केंद्रांवर भरती राबवली जाणार आहे. जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील राज्य राखीव दलाच्या मैदानावर ३७ हजार २२७ उमेदवार या भरतीत सहभागी होणार आहेत.
फेब्रुवारी २०२० दरम्यान महामंडळाने भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. पण त्यानंतर मार्च २०२० पासून कोरोना संसर्ग सुरू झाला होता. त्यामुळे भरती स्थगित केली होती. पण आता पुन्हा महामंडळाने अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवारांना ९ जिल्ह्यातील राज्य राखीव दलांच्या केंद्रावर शारीरीक चाचणीसाठी बोलवले आहे.
औरंगाबाद, नांदेड, बुलडाणा, लातूर जिल्ह्यांतील १९ हजार ३२२ युवक औरंगाबादेत येतील. जालना, परभणी, हिंगोली, बीड आणि उस्मानाबाद येथील १७ हजार ९०५ युवक जालन्यातील एसआरपीएफमध्ये भाग घेतील. पुण्यात १३ हजार ५९ युवक सहभाग घेतील.पुणे जिल्ह्यातील दौंड येथे दोन बलगट क्रमांक आहेत. त्यामध्ये दौंडच्या बलगट क्रमांक पाचमध्ये १७ हजार १२६ युवक सातारा, सोलापूर आणि नाशिक येथून येतील. बलगट क्रमांक ७ मध्ये १५ हजार ४६३ युवक सांगली, कोल्हापूर, अहमदनगर या तीन जिल्ह्यांतील युवक सहभागी होतील. नवी मुंबई येथील बाळेगावच्या बलगट क्रमांक ११ मध्ये ७ हजार ५ युवक सहभागी होणार आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांतील युवक आपली चाचणी देतील. नागपूरच्या एसआरपीएपमध्ये ११ हजार ६७२ युवक सहभागी होतील.