नवी दिल्ली: देशात दिवाळीचे स्वागत होत असताना पाकिस्तानने सीमेवर भ्याडपणे शस्त्रसंधीचे उल्लंघन करत विविध भागात गोळीबार केला. यात भारताचे ३ जवान शहीद झाले, तसेच ३ नागरिकही ठार झाले. पाकच्या या कृत्याचे भारतीय लष्कराने सडेतोड उत्तर दिले. भारताच्या या कारवाईत पाकिस्तानचे ७ ते ८ सैनिक मारले गेले आहेत. मारल्या गेलेल्या पाकिस्तानच्या सैनिकांमध्ये २ ते ३ पाकिस्तानी एसएसजी कमांडोंचाही समावेश आहे, अशी माहिती भारतीय लष्कराने दिली.
भारतीय लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याने केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे कमीतकमी १० ते १२ सैनिक जखमी झाले आहेत. या बरोबरच भारताच्या या कारवाईत पाकिस्तानी बंकर ईंधन डंप आणि लॉन्च पॅड नष्ट झाले आहे.
उरी सेक्टरमध्ये नंबाला येथे भारताचे तीन जवान शहीद झाले. हाजी पीर सेक्टरमध्ये एका बीएसएफ इन्स्पेक्टरने देखील जीव गमावला.बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्येच कामलकोटे येथे तीन नागरिक ठार झाले आहेत. यांपैकी एक महिला हाजी पीर सेक्टरच्या बालकोटे येथे मारली गेली. पाकिस्तानच्या या गोळीबारामध्ये अनेक नागरिक जखमी झाले आहेत.
उरीतील अनेक ठिकाणांव्यतिरिक्त बांदीपोरा जिल्ह्यात गुरेज सेक्टरच्या इजमर्ग आणि कुपवाजा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. लष्कराने केरन सेक्टरमध्ये गोळीबार करत घुसखोरी करण्याचा पाकचा प्रयत्न हाणून पाडला, असे संरक्षण विभागाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले. केरल सेक्टरच्या LOC वरील फॉरवर्ड पोस्टवर आमच्या जवानांनी काही संशयित हालचाली पाहिल्या. त्यानंतर सतर्क असलेल्या जवानांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला.