येस न्युज नेटवर्क : आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या जास्तीत जास्त भाविकांना विठुरायाचं दर्शन घडावं यासाठी आजपासून 24 तास दर्शन व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. आजपासून देवाचे सर्व राजोपचार बंद करण्यात आले आहेत. याबातची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. तसेच आज सकाळी 11 वाजता विठ्ठल रुक्मिणीचा पलंग बाहेर काढण्यात आला आहे. त्यामुळं आता आषाढी यात्रा संपेपर्यंत देव झोपायला जाणार नाहीत, अशी प्रथा आहे.
पदस्पर्श आणि मुख दर्शनाचा लाभ देण्यासाठी आजपासून देवाचे सर्व राजोपचार बंद करण्यात आले आहेत. आजपासून 24 तास दर्शन व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील राजकीय महानाट्यानंतर यंदा आषाढी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे. याबाबतची माहिती देखील मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. यंदा आषाढी वारीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिर समितीनं निमंत्रण दिलं होतं. मात्र गेल्या दोन दिवसात झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापुजा होणार आहे.