- सोलापूर – मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते या योजनेंतर्गत दक्षिण तालुक्यातील 80 किलोमीटरचे रस्ते तयार होणार असून यासाठी तब्बल 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून दक्षिणच्या सर्व गावामधील शिवारातील रस्ते जोडले जाणार असून यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण दूर होणार असल्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले. मातोश्री ग्रामसमृद्धी शेत- पाणंद मंजूर रस्त्यांच्या कामासंदर्भात जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित आढावा बैठकीत आमदार सुभाष देशमुख बोलत होते.या बैठकीला सरपंच मंडळ अधिकारी, तलाठी ग्रामसेवक हजर होते.
- आमदार देशमुख पुढे म्हणाले की, शेती हा शेतकऱ्यांचा आत्मा आहे. मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्त्यांच्या माध्यमातून शेत शिवार हे गावांना खऱ्या अर्थाने जोडले जाणार आहे. या योजनेतून रस्ते मजबूतीकरण कामाचा समावेश करण्यात आला आहे. एका किलोमीटरसाठी तब्बल 25 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. दक्षिण तालुक्यातील सर्व 29 गावांमधून 80 किलोमीटरचे रस्ते या योजनेच्या माध्यमातून तयार होणार आहेत.
- शासनस्तरावरून या योजनेच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात येणार असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांची रस्त्यांची समस्या कायमस्वरूपी दूर होणार आहे. मातोश्री शेत पाणंद रस्ते योजना मनरेगा आणि राज्य रोहयो यांच्या मिश्रणातून राबविण्यात येणार आहे. यासाठीचा निधी राज्य रोहयोच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आला आहे. या योजनेतून दक्षिण मधील सर्व गावातून कमीत कमी दोन किलोमीटर ते जास्तीत जास्त सहा किलोमीटरचे रस्ते तयार होणार आहेत, असेही आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.
- यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशदिन शेळके, तहसीलदार अमोल कुंभार, तहसीलदार राजशेखर लिंबारे तसेच गटविकास अधिकारी बी.डी. वाघ, माजी पंचायत समिती सदस्य रामप्पा चिवडशेट्टी , कार्यकारी अभियंता खराडे, सहा. गट विकास अधिकारी शीतल बुलबुले, उपअभियंता महाजन, उप अभियंता बोधले, यासह सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.
सर्व त्रुटी त्वरित दूर करा: आ. देशमुख
तालुक्यातील रस्त्यांची कामे लवकरच सुरू होत आहेत. शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या त्रुटी असतील त्या लवकरात लवकर दूर कराव्यात. मोजणीची मागणी करणे, कोर्टात जाणे यामुळे विनाकारण कामास विलंब होतो, त्यामुळे पुढील रस्ते मंजूर करताना अडचण निर्माण होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या गोष्टी टाळाव्यात, असे आवाहन यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी केले.
