एनटीपीसी येथे पार पडली बैठक ; प्रलंबित निधी मिळण्याबाबत एनटीपीसी आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत सूचना दिल्या
सोलापूर – उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीच्या योजनेतील एकूण 250 कोटी रुपयांपैकी १४५ कोटी रुपये हे प्रलंबित होते. तरी प्रलंबित असलेला १४५ कोटी रुपयांचा निधी अदा करण्याबाबत खा.डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी एनटीपीसी प्रकल्पात याबाबत संयुक्त बैठक आयोजित केली होती. या बैठकीत खा.डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे डिसेंबर अखेर १०० ते जानेवारी महिन्यात १४५ कोटी रुपयांचा निधी संबंधित विभागाकडे अदा करण्याचे एनटीपीसीने मान्य केले असल्याची माहिती खा.डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी दिली.
सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी दुहेरी समांतर जलवाहिनीच्या माध्यमातून एनटीपीसी आणि सोलापूर महानगरपालिका यांच्यात २७ ऑक्टोबर २०१६ रोजी सामंजस्य करार झाला होता. या प्रकल्पासाठी एनटीपीसीने 250 कोटी रुपये देण्याबाबत झालेल्या करारापैकी १४५ कोटी प्रलंबित असल्याने या योजनेस विलंब होत असल्याचे लक्षात घेऊन खा.डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी एनटीपीसी येथे संयुक्त बैठक घेत याबाबत आवश्यक त्या सूचना केल्या.
सुरुवातीला डॉ. खा.जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी या कामाचा (समांतर जलवाहिनीच्या) प्रकल्पाचा आढावा घेतला. समांतर जलवाहिनी योजना कार्य प्रगती पथावर असून प्रलंबित १०० कोटी रुपये डिसेंबर अखेर उर्वरित ४५ कोटी रुपये जानेवारी मधे अदा करण्याच्या सूचना केल्या. त्यास एनटीपीसीचे महाप्रबंधक तपन बंदोपाध्याय यांनी सकारात्मकता दर्शवित डिसेंबर अखेर हा प्रलंबित निधी अदा करण्याचे सांगितले. त्यामुळे ही योजना विना अडथळा लवकरच मार्गी लागणार आहे.
यावेळी एनटीपीसीचे महाप्रबंधक तपन बंदोपाध्याय, सोलापूर लोकसभा प्रभारी विक्रम देशमुख, स्मार्ट सिटी कंपनीचे लेखाधिकारी मनीष कुलकर्णी, एनटीपीसीच्या विभाग प्रमुख अनुराधा मॅडम अन्य अधिकारी उपस्थित होते.