नवी दिल्ली : सरकारच्या महत्त्वाकांक्षी उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे लॉन्चिंग पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करण्यात आले . 2021-22 या आर्थिक वर्षात देशभरातील 1 कोटी महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले . उत्तर प्रदेशच्या महोबा जिल्ह्यातील 1 हजार महिलांना मोफत गॅस कनेक्शन देऊन या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव मौर्य आणि दिनेश शर्मादेखील उपस्थित होते. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे त्या राज्यातून या योजनेचा शुभारंभ करण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या योजनेत सरकारकडून केवळ कनेक्शनच नव्हे, तर मोफत सिलिंडरदेखील दिले जाणार आहेत. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना स्वतःच्या पत्त्याचा पुरावा देण्याची गरज नसल्याचे सरकारने म्हटले आहे. आपले नाव आणि पत्ता एवढ्या तपशीलासह या गॅस योजनेसाठी महिलांना अर्ज करता येणार आहे. या योजनेत पात्र ठरण्यासाठीचे निकष सरकारने निश्चित केले आहेत.