नवी दिल्ली: ७१ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीतील राजपथ सज्ज झालं आहे. या राजपथावर भारतीय लष्कराच्या सामर्थ्याचं, सांस्कृतिक वारशाचं आणि सामाजिक-आर्थिक प्रगतीचं दर्शन होईल. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला ब्राझीलचे राष्ट्रपती जायेर बोलसोनारो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. प्रजासत्ताक दिनाचा भव्य सोहळा साजरा करण्यात येत असतानाच, सुरक्षा व्यवस्थाही कडेकोट असणार आहे. हजारो पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान सतर्क असणार असून, त्यांची करडी नजर असणार आहे. राजपथावर सांस्कृतिक आणि आर्थिक प्रगतीचं दर्शन घडवणाऱ्या २२ चित्ररथांपैकी १६ चित्ररथ हे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे असतील. सहा विविध मंत्रालये आणि विभागांचे चित्ररथ यात सहभागी होतील.