सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील गोदूताई परुळेकर विडी घरकुल परिसरात सोशल डिस्टन्सिंग पाळा, गर्दी करु नका, असे सांगणाऱ्या परिचारिका व तिच्या पतीची गाडी जाळल्याची घटना घडलीय. यात वळसंग पोलिसांनी आज शुक्रवारी तिघांना अटक केलीय.
श्रीकांत अंबादास यादगिरी, नितीन अंबादास यादगिरी व अंबादास दोरनाल (तिघेही राहणार गोदूताई परुळेकर विडी घरकुल) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. सोलापुरातील एका सहकारी रुग्णालयात परिचारिका असलेल्या सुरेखा श्रीशैल पुजारी (रा. घरकुल) घराकडे मोटरसायकलवरून पतीसोबत निघाल्या होत्या. त्यावेळी संशयित आरोपी येथील मैदानात क्रिकेट खेळत होते. तेव्हा परिचारिका पुजारी यांनी या सर्वांना गर्दी करून खेळू नका, कोरोनाचा संसर्ग वाढलेला आहे, काळजी घ्या असे सांगितले. मात्र या संशयित तिन्ही आरोपींनी तूच रुग्णालयात जातेस, तुझ्यामुळेच कोरोना आमच्याकडे येईल’ म्हणून धमकी दिली होती.
धमकीनंतर काल गुरुवारी रात्री १२ ते आज पहाटे दोन दरम्यान परिचारिका पुजारी यांच्या घरासमोर लावलेली दोन मोटारसायकली तिघांनी जाळल्या. यात मोटरसायकल (एम. एच. १३ बी जे ६१५५) व स्कुटी (एम. च. १३ सी. एन.४२५०) जळाल्या. त्याचे ४५ हजाराचे नुकसान झाले. याप्रकरणी परिचारिका पुजारी यांच्या फिर्यादीनुसार तिघांविरुद्ध वसंत पोलिसात गुन्हा नोंद झाला असून त्यांना अटक करण्यात आलीय. अधिक तपास पोलीस हेडकाँन्स्टेबल एम. एस. बोराडे करीत आहेत.