सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील रेल्वे स्थानके आता अधिक पर्यावरणपूरक बनत आहेत. राष्ट्रीय हरित लवादाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सोलापूर विभागातील रेल्वे स्थानकांवर काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. रेल्वे स्थानक पर्यावरण व्यवस्थापन प्रणालीत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या सोलापूर स्थानकास एनएबीसीबी मान्यताप्राप्त संस्थेकडून गतवर्षी सप्टेंबरमध्ये आयएसओ १४००१ मानांकन प्रमाणपत्र मिळाले होते. यानंतर सोलापूर विभागातील आठ रेल्वे स्थानकांना आयएसओ १४००१ मानांकन प्रमाणपत्र मिळाले आहे, आयएसओ मानांकन मिळालेल्या रेल्वे स्थानकांमध्ये अहमदनगर, दौंड, कोपरगाव, लातूर, कलबुर्गी, साईनगर-शिर्डी, वाडी आणि कुर्डुवाडी यांचा समावेश आहे.
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे यांच्याकडे आयएसओ १४००१ मानांकन प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले. आयएसओ १४००१-२०१५ मानांकन प्रमाणपत्र मिळविणारी सोलापूर विभागातील आता नऊ रेल्वे स्थानके झाली आहेत. एनएबीसीबी मान्यता प्राप्त बोर्डाव्दारे लेखा परीक्षण करण्यात आले.