सोलापूर- तरुणाईला स्वयंरोजगार बनवण्यासाठी, कौशल्य विकासाला चालना देण्याकरिता तसेच उद्योजक पिढी निर्माण करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे 29 फेब्रुवारी 2020 रोजी क्रिएट सेल्फ एम्प्लॉयमेंट उद्योजकता प्रोत्साहन शिबिर व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे प्रथमच अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापुरातील संगमेश्वर महाविद्यालयाच्या मैदानावर सदर उद्योजकता प्रोत्साहन शिबीर व प्रदर्शन होणार आहे. या क्रिएट सेल्फ एम्प्लॉयमेंट उद्योजकता प्रोत्साहन शिबिर व प्रदर्शनामध्ये प्रामुख्याने नोकरीच्या मागे न लागता स्वतः स्वयंरोजगार बनवून उद्योजक कसे होता येईल, हा संदेश विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. त्यामध्ये तज्ञांचे मार्गदर्शन मिळण्याबरोबरच यशस्वी उद्योजक, उद्योजक होण्यासाठी आवश्यक स्किल्स आणि विविध प्रकारचे सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग उभा करून स्वयंरोजगार प्राप्त केलेल्या मान्यवरांचे दालन व माहिती मिळणार आहे.
कृषी, अन्नदान, औद्योगिक, वैद्यकीय, सेवाक्षेत्र आदी विविध क्षेत्रांमध्ये स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी आहेत. या संधीची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी व त्यातून प्रेरणा घेऊन स्वतः स्वयंरोजगार करिता सक्षम होण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे क्रिएट सेल्फ एम्प्लॉयमेंट उद्योजकता शिबिर व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. या प्रदर्शनात शासकीय-निमशासकीय संस्था तसेच विविध बँका आणि उद्योजकांच्या स्टॉलचा समावेश राहणार आहे.
क्रिएट सेल्फ एम्प्लॉयमेंट उद्योजकता शिबीर व प्रदर्शन विद्यापीठाच्या इनक्युबेशन सेंटर आणि वाणिज्य व व्यवस्थापन संकुल या विभागामार्फत आयोजित करण्यात आले आहे. सध्या यासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. त्यामार्फत सध्या या कार्यक्रमाची तयारी सुरू असल्याची माहिती कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी दिली.
स्वतः उद्योग उभा केलेल्यांना स्टॉल घालण्याची संधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामार्फत आयोजित क्रिएट सेल्फ एम्प्लॉयमेंट उद्योजकता प्रशिक्षण शिबीर व प्रदर्शनात स्वतः उद्योग उभा केलेल्या उद्योजकांना स्टॉल घालण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. यामध्ये विविध प्रकारच्या सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांचा समावेश राहील. बचत गटांच्या महिलांनाही यामध्ये स्टॉल घेऊन आपल्या उद्योगाचे प्रमोशन करण्याची संधी आहे. त्यातच विद्यार्थ्यांनाही एखादे उद्योग सुरू केल्यास त्याचे प्रदर्शन या कार्यक्रमात मांडून अन्य विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देता येणार आहे. याकरिता सध्या स्टॉलची नोंदणी सुरू झाली आहे. 10 फेब्रुवारी 2020 पर्यंत स्टॉलसाठी नोंदणी करता येणार आहे. अधिक माहितीसाठी डॉ. रमेश गाढवे 9421912216 आणि प्रा. अमोल वीर 9730357839 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.