सोलापूर, दि.7- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संशोधकांनी मार्च ते ऑगस्ट 2020 या कालावधीतील कोरोना व लॉकडाऊनचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम झाला व विद्यार्थ्यांच्या आनंदाचा पातळीचा अभ्यास केलेला असून या संशोधन अहवालाचे प्रकाशन बुधवार, 9 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी बारा वाजता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ऑनलाइन होणार असल्याची माहिती कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश वानखडे यांच्या समन्वयातून मागील सहा महिने कालावधीतील विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करण्यात आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने कोरोना आणि लॉकडाऊनमधून विद्यार्थ्यांना काय शिकायला मिळाले याचा अभ्यास झालेला आहे. कोरोना संसर्गाची किती माहिती विद्यार्थ्यांनी मिळवली, मास्क, सोशल डिस्टन्स आणि सॅनिटायझरचा किती वापर केला आणि याचबरोबर ऑनलाइन शिक्षण काय घेता आले याचा अभ्यास या संशोधनामध्ये केलेला आहे. 5000 विद्यार्थ्यांमधून निवडक 600 फॉर्म वेगळे करून त्याचा अभ्यास केलेला आहे.
या संशोधनाचे प्रकाशन बुधवार, 9 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ऑनलाइन होणार आहे. यावेळी प्र-कुलगुरू डॉ देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.