सोलापूर, दि.6- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा या होणार आहेत. यासंदर्भात कोणत्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा केव्हा व कशा पद्धतीने होतील, याचे वेळापत्रक शासनाच्या निर्देशानुसार लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून सूचना प्राप्त झाल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
सोमवारी, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरू यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. यावेळी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन परीक्षा यासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
राज्यात कोरोना विषाणू (कोव्हीड १९ ) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आढावा बैठकीत राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू तसेच उच्च तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने आदींचा सहभाग होता.
या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठकीत महाविद्यालय परीक्षा वेळापत्रक नियोजन, शैक्षणिक वर्षाचे नियोजन, ऑनलाइन अध्यापन प्रणालीचा वापर यावर सविस्तर चर्चा झाली. सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्याचबरोबर सीईटी एक्झामदेखील घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. त्यानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा होतील. त्यासंदर्भाचे वेळापत्रक लवकरच शासनाच्या निर्देशानुसार जाहीर करण्यात येईल व नियोजन करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले आहे.
.
‘कोव्हीड 19’ टेस्ट संदर्भात विद्यापीठाचे कौतुक
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या 26 विद्यार्थ्यांना ‘कोव्हीड 19’ टेस्ट करण्यासंदर्भात ट्रेनिंग देण्यात आले आहे. यासंदर्भाची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना दिली. त्यावेळी मंत्री सामंत यांनी विद्यापीठाच्या या उपक्रमाचे कौतुक करत इतर विद्यापीठांनीही त्या संदर्भात माहिती जाणून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.