सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील आयक्यूएसी विभागामार्फत शनिवार, दि. 12 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता “सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग, उद्यमशीलता आणि विद्यापीठांची भूमिका” या विषयावरील आयोजित ऑनलाइन राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते होणार आहे.
यात केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा प्रमुख सहभाग राहणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घु यांचीही उपस्थिती राहणार आहे.
कोरोना आणि लॉकडाऊनचा सर्व क्षेत्रांना मोठा फटका बसला. यामधून उभारी घेण्यासाठी केंद्र शासनाकडून आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा करण्यात आली. शिक्षण, उद्योग, कृषी यासारख्या क्षेत्रासाठी आत्मनिर्भर पॅकेजमध्ये विविध तरतुदी झाल्या आहेत. उद्योग क्षेत्र प्रगतीसाठी एक महत्त्वाचे माध्यम आहे. त्याचबरोबर युवकांच्या उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबविल्या जातात. यासाठीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कडून उद्योग व विद्यार्थ्यांच्या उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्याकरिता विद्यापीठांची भूमिका या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे प्रमुख मार्गदर्शन यात करणार आहेत. ऑनलाइन राष्ट्रीय चर्चासत्राचा विद्यार्थी, नागरिक यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.