सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस विभागाच्या पेट्रोल पंपावर लवकरच सीएनजीची विक्री केली जाणार आहे. सोलापूरातील एकाही पेट्राल पंपावर अद्याप ‘सीएनजीची’ विक्री केली जात नाही. ग्रामीण पोलीस विभागाच्या पेट्रोल पंपावर लवकरच ही सुविधा उपलब्ध केली जाईल. असे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे विभागीय व्यवस्थापक महेंद्र दळवी यांनी पेट्रोल पंपाच्या दुस-या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सांगितले.
ग्रामीण पोलीस दलाच्या पेट्रोलपंपाचा दुसरा वर्धापन दिन चार मार्च 2020 रोजी झाला. यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस उपअधीक्षक अरुण सावंत, विक्री अधिकारी नीरज सिंग, उप विभागीय अधिकारी नीरज शिंदे उपस्थित होते.
दळवी यांनी सांगितले की, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचा सीएनजी सेवा देण्याबाबत आयएमसी समूहाशी सामंजस्य करार झाला आहे. सीएनजी सेवा देण्यासाठी आवश्यक असणा-या परवानगीसाठी प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या कार्यान्वित झाल्यानंतर सीएनजी विक्री सेवा देणारा हा पहिला पेट्रोलपंप ठरेल असे दळवी यांनी सांगितले.
ग्रामीण पोलीस विभागाकडून चार मार्च 2020 रोजी सुरु झालेल्या या पेट्रोलपंपाला पेट्रोल, विक्री संदर्भातील एक्सलन्स अँड अचिव्हमेंट अवॉर्ड देण्यात आला. सहा जिल्ह्यात पेट्रोल विक्रीत या पंपाला सतत दुसरा क्रमांक राहिला आहे. या पंपावर 27 कर्मचारी सेवेत आहेत. द्वितीय वर्धापन दिनानिमित्त या सर्व कर्मचा-यांना वेतनवाढ देण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जाहीर केले. यावेळी नियमित ग्राहकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अरुण तांदूळकर तर आभार प्रदर्शन अरुण सावंत यांनी केले.
नफ्यातून पोलीस कल्याणच्या विविध योजना : अधीक्षक पाटील
पेट्रोल पंपाच्या नफ्यातून पोलीस कल्याण विभागाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. दोन वर्षात सोलापूरकरांनी आमच्या पेट्रोल पंपाला चांगला प्रतिसाद दिला आहे. पंपाला वाढीव नफ्यातून पोलीस कल्याण योजनांवर अधिक खर्च करता येईल, असे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.