सोलापूर : येथील यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार प्रशाला आज शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी अनोख्या स्वरूपात ऑनलाइन भरली. मा मुख्यमंत्री , मा शिक्षणमंत्री ,मा शिक्षण संचालक यांनी केलेल्या 15 जून पासून शैक्षणिक वर्ष सुरू होईल आणि शाळा ऑनलाईन सुरू होतील या आवाहना नुसार नियोजन करण्यात आले होते. शैक्षणिक वर्षाच्या पूर्वसंध्येला सर्व पालकांची मुख्याध्यापक तानाजी माने यांनी ऑनलाईन पालक सभा घेतली आणि त्यामध्ये विद्यार्थी व पालकांना नवीन शैक्षणिक वर्ष कसे सुरु होईल याविषयी सूचना दिल्या .
आज १५ जून रोजी सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांनी विद्यार्थ्यांना मायक्रोसॉफ्ट टीम्स च्या माध्यमातून ऑनलाइन लिंक पाठवण्यात आली विद्यार्थी या लिंक वर ऑनलाइन जॉईन झाले .त्यानंतर साडे अकरा वाजता नेहमीप्रमाणे बेल देण्यात आली. सर्व शिक्षक व विद्यार्थी आपापल्या घरी बेलचा आवाज ऐकून राष्ट्रगीतासाठी उभे राहिले. मुख्याध्यापकांनी राष्ट्रगीताची शाळेतून सुचना दिली आणि स्पीकरवर राष्ट्रगीत सुरू झाले , सर्व शिक्षक व विद्यार्थी यामध्ये घरूनच सहभागी झाले .जवळपास तीन महिन्यानंतर राष्ट्रगीत ऐकून शिक्षक व विद्यार्थी भारावून गेले. अनेक विद्यार्थी पूर्ण युनिफॉर्म घालून राष्ट्रगीत साठी तयार झाले होते . राष्ट्रगीत झाले आणि त्यानंतर सर्व वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांची ऑनलाइन हजेरी घेतली .वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवण्याचे वेळापत्रकही दिले .तासभर त्यांच्याशी संवाद साधला. एक वाजता वर्ग संपवण्यात आला. या अनोख्या वर्गा मध्ये अनेक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना यु ट्यूब वरील व्हिडीओ , नवनवीन फोटो दाखवले, गाणी लावली. घरबसल्या भरलेली ही शाळा पाहून विद्यार्थीही भारावून गेले.
या ऑनलाईन भरलेल्या शाळेबद्दल संस्थाध्यक्ष मनोहर सपाटे, सचिव प्राचार्य डॉक्टर अनिल बारबोले, संचालक ज्ञानेश्वर सपाटे, शालेय समितीचे चेअरमन चिंतामणी सपाटे यांनी समाधान व्यक्त केले आणि सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.