सोलापूर दि. 20 : लॉकडाऊनच्या कालावधीत रेशन कार्ड धारकांना धान्याची पावती दिली नाही म्हणून शहरातील तीन स्वस्त धान्य दुकानांची संपूर्ण अनामत रक्क्म जप्त करण्याची कार्यवाही अन्न धान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील यांनी केली आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत राज्य शासनाने रेशनकार्ड धारकांना विविध योजनेअंतर्गत धान्य वितरणाचे सूचना दिल्या होत्या. तथापि जिल्ह्यातील काही रास्तभाव दुकानदार नियमानुसार धान्य वाटप करत नाहीत. तसेच रेशन कार्ड धारकांना पावती देत नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे शहरातील परिमंडळ अ विभागातील श्री जमात पंजाब तालीम, रास्त भाव दुकान क्रमांक अ-8 आणि सौ. शांताबाई बाबुराव म्हमाणे अ-1 आणि परिमंडळ क विभागातील मजिकांर्जून बनसोडे रास्तभाव दुकान क्रमांक 57 या तीन दुकानांच्या अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे, असे पाटील यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
याचबरोबर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मौजे पिंपळनेर येथील गंगामाई महिला बचत गट आणि पी. एस. लोकरे यांच्या रास्त भाव दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले. बार्शी तालुक्यातील मौजे चिखडे येथील दुकान क्रमांक 61 निलंबित करण्यात आले आहेत. धान्य वाटपात अनियमितता, मूळ शिधापत्रिका आणि ऑनलाईन शिधापत्रिकेच्या नावात बदल अशा त्रुंटीमुळे जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून ही कार्यवाही करण्यात आली, असे पाटील यांनी सांगितले.