सोलापूर, (प्रतिनिधी):- महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीने सोलापूर रंगे नेत्यांच्या संगे या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमातून सोलापूरचे कर्तुत्ववान तीन सुपुत्र,माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना एकाच मंचावर आणून एकत्रीतपणे त्यांची मुलाखत सोलापूरचे चौथे सुपुत्र ज्येष्ठ पत्रकार विवेक घळसासी घेणार आहेत. हा कार्यक्रम रविवार दि. 15 मार्च 2020 रोजी सायंकाळी 6 वा. हि.ने.वाचनालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये होणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सोलापूरमधील सर्व स्थानिक वृत्तवाहिन्यांमधून करण्यात येणार आहे रसिक श्रोत्यांनी हा कार्यक्रम घरबसल्या पाहता येणार आहे.
सोलापूरच्या तीन सुपुत्रांना एकत्र आणून त्यांची मनमोकळेपणाने आणि दिलखुलास मुलाखत सोलापूरचे चौथे सुपुत्र ज्येष्ठ पत्रकार विवेकजी घळसासी घेतील. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी विधानसभा, राज्यसभा, लोकसभा, राज्यपाल, लोकसभेचे सभागृहनेते आणि जागतिक पातळीवर युनो मध्ये जावून तेथील सभागृह गाजवले होते तसेच त्यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्य मंत्री ते मुख्यमंत्री आणि केंद्रात ऊर्जा आणि गृह ही दोन महत्वाचे मंत्रीपदे यशस्वीपणे सांभाळली होती. तर माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा असा प्रवास करीत राज्यातील राज्यमंत्री ते उपमुख्यमंत्री असा प्रवास केला त्याचबरोबर माजी सहकारमंत्री सुभाष बापू देशमुख यांनी विधानपरिषदेपासून सुरूवात केली ते लोकसभा आणि विधानसभा असा प्रवास करीत राज्याचे सहकारमंत्री हे महत्वाचे खाते त्यांनी सांभाळले अशा सोलापूरच्या सुपुत्रांना विविध राजकीय पक्षाचे असले तरी त्यांना एकत्र एकाच मंचावर आणून त्यांचा राजकीय प्रवास, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, उद्योग अशा विविध क्षेत्रात तसेच सोलापूरच्या विकासात त्यांचे योगदान याबद्दल सविस्तर आणि मनमोकळ्या, मनसोक्त गप्पा, अनेक किस्से, काही गुपीते उघड करणारा, राजकारणासह राजकारणा पलीकडचा मनमोकळा कार्यक्रम ज्यामधून या नेत्यांच्या अनुभवाची नव्या पिढी समोर शिदोरी ठेवणारा हा कार्यक्रम म्हणजेच सोलापूर रंगे नेत्यांच्या संगे.
हा कार्यक्रम हुतात्मा स्मृती मंदिरात होणार होता परंतु सध्या जगभर पसरत असलेल्या कोरोना वायरसचा प्रार्दुभाव सोलापूरमध्ये होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाकडून महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करण्यात आली की हा कार्यक्रम छोटेखानी स्टुडिओ उभा करून तेथून स्थानिक वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करावे जेणे करून लोकांना घरबसल्या या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येईल त्या विनंतीवरून मसाप दक्षिण सोलापूर शाखेच्या वतीने हि ने वाचनालयाच्या अॅम्फी थिएटर मध्ये हा कार्यक्रम नियोजित वेळेत म्हणजे रविवार दि. 15 मार्च 2020 रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे त्याचे प्रक्षेपण सोलापूरमधील इन सोलापूर न्यूज, वृत्तवेध, बीआर न्यूज, अस्मिता न्यूज या स्थानिक वृत्तवाहिन्यांवर तसेच येस न्यूज या युट्यूब आणि फेसबुकवरून होणार आहे तरी नागरीकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद आपल्या घरातूनच घ्यावा असे आवाहन अध्यक्षा रेणुका महागांवकर, कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, उपाध्यक्षा पृथा हलसगीकर, प्रमुख कार्यवाह जितेश कुलकर्णी, सहकार्यवाह गुरू वठारे, कोषाध्यक्ष अमोल धाबळे, सदस्य निलकंठ वाघचवरे, अविनाश महागांवकर, अभय जोशी, चंद्रकांत निकम यांनी केले.