सोलापूर – ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वरांच्या पावन सोन्नलगी नगरीत पर्यटन क्षेत्रात मोठी भर घालणारे सोन्नलगी अँक्वापार्क प्रायव्हेट लिमिटेड संचलित शॉवर अँन्ड टॉवर वॉटर पार्क सोलापूर तुळजापूर रस्त्यावरील तळेहिप्परगा येथे तयार करण्यात आले असून सोमवार दि.9 मे 2022 रोजी सिने अभिनेते रितेश देशमुख यांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बॉलिवुडचा सुपरस्टार रितेश देशमुख यांच्या हस्ते तर सोलापूरच्या कर्तव्यनिष्ठ आमदार प्रणितीताई सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त हरिष बैजल, मनपा आयुक्त पी शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, प्रिसिजनचे यतीन शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
राजकारण, समाजकारण करत सोलापूरच्या विकासाचा ध्यास घेवून लोकांच्यासाठी जगलेले माजी आमदार लोकनेते स्वर्गिय बाबुराव अण्णा चाकोते यांनी सोलापूर जिल्ह्याच्या सामाजिक, राजकीय, सहकार, शैक्षणिक क्षेत्रात विकासाची गंगा आणली. कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा बॅकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समृध्द करण्याचा प्रयत्न केला तोच वारसा स्वर्गिय बाबुराव अण्णा चाकोते यांच्या दुसऱ्या पिढीने म्हणजे माजी आमदार विश्वनाथ आण्णा चाकोते यांनी पुढे नेत सोलापूरमध्ये अनेक उपक्रम सुरू केले. हद्दवाढ झालेल्या सोलापूरचे ते पहिले महापौर होते. त्यांनी सोलापूरकरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. तसेम आमदार म्हणून अनेक उद्योग व्यवसाय नव्याने आणले त्यातून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला. आता त्यांच्या तिसऱ्या पिढीने म्हणजे विश्वशंकर अणि विश्वराज या दोघा सुपुत्रांनी सोलापूर जिल्ह्याच्या पर्यटनात वाढ व्हावी म्हणून प्रयत्न सुरू केले आहे. कायकवे कैलास हा मंत्र देणारे सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वर, शक्तीपीठ असलेल्या तुळजाभवानी, भक्तीचा झरा असलेले पंढरपूर आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणारे स्वामी समर्थ महाराजांचे अक्कलकोट, श्रीदत्त गुरूचे जागृत गाणगापूर असे धार्मिक पर्यटनासाठी प्रसिध्द असलेल्या सोलापूरकरांना मनोरंजनासाठी वॉटर पार्क असलेल्या मोठ्या शहरात जावे लागत होते. परंतु सोन्नलगी अॅक्वा प्रायव्हेट लिमिटेडने ही कमतरता शॉवर अँन्ड टॉवर या वॉटर पार्कच्या माध्यमातून भरून काढली आहे
.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे सोलापूर मधील एकमेव वॉटर पार्क
अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले आणि जगातील अमेरिका, ब्रझिल, सिंगापूर, स्पेन या ठिकाणी ज्या प्रमाणे वॉटर पार्क आहे त्याप्रमाणे सोन्नलगीचे हे शॉवर अँन्ड टॉवर वॉटर पार्क आहे. यामध्ये विविध प्रकारच्या 21 स्लाईड. या सर्व स्लाईड तीन गटात विभागण्यात आलेल्या आहेत. लहान मुलांसाठी बेबी स्लाईड, चाळीस वर्षावरील नागरीकांसाठी सॉफ्ट स्लाईड तर युवा वर्गासाठी साहस दाखवण्यासाठी अँडव्हेंचर स्लाईड अशा तीन स्लाईड आहेत. समुद्राच्या लाटांचा अनुभवही सोलापूरच्या या वॉटर पार्कमध्ये घेता येणार आहे. त्याचबरोबर दिव्यांगानाही वॉटरपार्कचा आनंद घेता यावा म्हणून 15 प्रकारच्या स्लाईड उलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या वॉटर पार्कमध्ये मनोरंजना बरोबर पोट पूजेकडेही लक्ष देण्यात आले असून त्यासाठी शाकाहारी निटनेटके असे दोन रेस्टॉरंट, स्वतंत्र कॉफी शॉप आहेत. या वॉटर पार्कमध्ये येणाऱ्या प्रत्येकासाठी विशेष सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये चेंजिंग रूम्स, लॉकर रूम्स, शॉवर एरिया, वॉशरूम, बेबी केअर रूम, प्रशिक्षित आणि नम्र कर्मचारी वर्ग अशा सुविधा तयार करण्यात आले असल्याची माहिती सोन्नलगी अँक्वापार्क प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विश्वशंकर चाकोते यांनी दिली.
सोलापूर शहर जिल्ह्यातील नागरीकांनी वॉटर पार्कसाठी सोलापूरच्या बाहेर जायचे नाही सोलापूर शहरातच अत्याधुनिक आणि नव्या तंत्रज्ञानासह सुरक्षित असे शॉवर अँन्ड टॉवर वॉटर पार्क सुरू करण्यात येत आहे त्याला आपण आपल्या परिवारासह तसेच नातेवाईक मित्रांसह अवश्य भेट द्या. सोन्नलगी वॉटर पार्क मध्ये विवाह सोहळे, कार्पोरेट कार्यक्रम, शाळांची सहल असे विविध उपक्रमही मोठ्याप्रमाणात करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला विश्वराज चाकोते उपस्थित होते.