मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मोठी गुड न्यूज दिली आहे. पाच दिवसांचा आठवडा करण्याची गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागणीला ठाकरे सरकारनं अखेर मंजुरी दिली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयीचा निर्णय घेण्यात आला. 29 फेब्रुवारीपासून या निर्णयाची अमलबजावणी केली जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्यद्री अतिथीगृहावर शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंबंधी बैठक घेतली होती. अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग.दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस विनायक लहाडे, डॉ. सोनाली कदम, तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, प्रधान सचिव नितिन गद्रे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित असलेल्या या बैठकीत पाच दिवसांचा आठवडा करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले होते.