पंढरपूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवरजिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला जीवनावश्यक गरजांची पूर्तता केली जावी याकरिता प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जिल्हाधिकारी मिनींद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे केली आहे.
कोरोना व्हायरसमुळे देशातच21 दिवस संचारबंदी लागू केली असून लोक घरातच कैद झाले आहेत . कोरोना व्हायरसच्या भीतीने लोकांनीही घरात राहणे पसंत केले असून मूलभूत गरजांसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद मिळत आहे, तसेच गुन्हे दाखल होत आहेत. या परिस्थितीत माजी खा रणजितसिंह मोहिते पाटील यांनी प्रशासनास लेखी निवेदन देऊन लोकांच्या अडचणीकडे लक्ष वेधून घेतले आहे.
या संचार बंदीचा मोठा फटका व्यापारी , उद्योजक , शेतकरी व हातावर पोट असणाऱ्या रोजंदारी कामगारांना बसू लागला आहे . व्यापारी व उद्योजक यांनी आपले व्यवहार व उत्पादन बंद ठेवले आहे. तर शेतकरी वर्ग अडचणीत आलेला आहे. सद्या मोठ्या प्रमाणात भाजीपाला , द्राक्षे, डाळिंब यासारख्या फळबागा उतरणीला तयार आहेत . पण कोरोनामुळे मार्केट बंद असल्याने तयार माल विकायचा कोठे हा मोठा प्रश्न आहे . गावचे आठवडा बाजार बंद झाले आहेत तर दळणवळण ठप्प झाले आहे . या पार्श्वभूमीवर तयार मालाचे करायचे काय हा प्रश्न निर्माण झाला आहे . त्यातच चैत्री पाडव्याच्या मुहूर्तावरच अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे . वादळ , वारे , पाऊस असा तिहेरी सामना करीत शेतीमाल वाचविण्याचे मोठे संकट त्यांच्या समोर उभे राहिले आहे .
सध्या विज , पाणी , अन्नधान्य या मुलभूत गरजा शासनाने पुरवाव्यात अशी मागणी करणारे पत्रच माजी खासदार मोहिते पाटील यांनी प्रशासनाला दिले आहे . जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, सोलापुरचे पोलीस आयुक्त दिपक तावरे,सोलापूर महानगरपालिका,आयुक्त अंकुश शिंदे यांना तातडीने पत्रव्यवहार करुन संचारबंदी काळात लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे . संचारबंदीच्या शेतकऱ्यांचा शेतमाल गरजेच्या ठिकाणी व जिल्ह्याबाहेर पोहोचवण्यासाठी परवानायुक्त वाहतूक व्यवस्था उभी करावी , उन्हाळ्यात ट्रांसफार्मर जळण्याचे प्रमाण जास्त असते. अखंडित वीज पुरवठा सुरू राहण्यासाठी ट्रांसफार्मर भरणाऱ्या व बनवणाऱ्या कंपन्या सुरू राहाव्यात, घरपोच शुद्ध पिण्याचे पाणी पोहोच करणाऱ्या व्यवस्था नित्य सुरु राहाव्यात, जीवनावश्यक वस्तू तथा खाद्यपदार्थांचा तुटवडा होता कामा नये, भाजी मंडई मधील गर्दी टाळण्यासाठी हात गाडीवरून भाजीपाला विक्रीसाठी परवानगी असावी, आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तंबू बनवणाऱ्या कारखान्यांकडून अतिरिक्त तंबू बनवून घ्यावेत जे गरजेनुसार राज्यभर पुरवता येतील, आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सोयीच्या इमारती, वसतिगृहे, व मठ यांची पडताळणी करून ठेवावी,सेवानिवृत्त झालेले सरकारी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना सेवेसाठी सज्ज ठेवावे, शिक्का मारलेल्या संशयित व्यक्ती बाहेर पडणार नाही त्यासंदर्भात दक्षता राहावी अशी मागणी रणजितसिंह मोहिते -पाटील यांनी केली आहे.