सोलापूर – काशीपीठात जगद्गुरु विश्वाराध्य गुरुकुलाच्या नामकरणाचा शतमानोत्सव साजरा होत असून त्या निमित्ताने चौथे अ.भा. वीरशैव मराठी साहित्य संमेलन वाराणसी येथील जंगमवाडी मठाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले असून 8,9 व 10 फेब्रुवारी 2020 या कालावधीत श्रीकाशीजगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या सान्निध्यात हे संमेलन होणार आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून वीरशैव साहित्याचे अभ्यासक व संशोधक शांतितीर्थ स्वामी, औरंगाबाद यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संमेलनाचे कार्यवाह डॉ. अनिल सर्जे यांनी दिली.
या संमेलनात तीन दिवस वीरशैव साहित्यावर विविध, परिसंवाद, चर्चासत्रे होणार असून संमेलनाचा समारोप 10 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता होणार असून यावेळी मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा अरुणा ढेरे यांची उपस्थिती असणार आहे. या संमेलनात काशीपीठातर्फे सोलापूरातील डॉ. शे.दे. पसारकर यांचा गौरव होणार आहे.