सोलापूर : माजी सहकारमंत्री व भाजपचे दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित लोकमंगल उद्योग समूहापैकी असलेल्या लोकमंगल साखर कारखान्याने इंडियन ओव्हरसीज बँकेतून शेतकऱ्याच्या नावाने दोन लाख ९८ हजारांचे कर्ज परस्पर घेतल्याची तक्रार संबंधित शेतकऱ्याने पोलिसांत केली आहे. गुलाब नबीलाल शेख असे तक्रारदार शेतकऱ्याचे नाव आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे व उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ अशा दोन ठिकाणी लोकमंगल साखर कारखाना कार्यरत आहे. यापूर्वी या कारखान्याने ऊस उत्पादक शेतक ऱ्यांच्या नावाने परस्पर बँक कर्जे घेतल्याची प्रकरणे उजेडात आली होती. पोलिसात तक्रारी दाखल करूनही कारखान्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती. ही प्रकरणे अंगलट येऊ नयेत म्हणून कारखाना प्रशासनानेही तक्रारदार शेतक ऱ्यांच्या नावे घेतलेली कर्जे लगेचच भरूनही टाकली होती. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा अशा प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. गुलाब नबीलाल शेख (रा. मंद्रूप, ता. दक्षिण सोलापूर) यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार २०१६ मध्ये लोकमंगल साखर कारखान्याकडून शेख यांच्या नावावर इंडियन ओव्हरसीज बँकेच्या सोलापुरातील रेल्वे लाइन्स शाखेतून दोन लाख ९८ हजार रुपयांचे कर्ज परस्पर घेण्यात आले होते. त्याची कोणतीही पूर्वसूचना शेख यांना देण्यात आली नव्हती. या कर्जाचे थकीत व्याज व मुद्दल रक्कम मिळून आता चार लाख ५१ हजार रुपये झाले आहेत. कागदपत्रे तपासल्यानंतर ही बाब आपणास समजली, तेव्हा आश्चर्याचा धक्का बसल्याचे शेख यांनी सांगितले. या तक्रारीचा पाढा त्यांनी एका पत्रकार परिषदेत वाचून दाखविला. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अप्पाराव कोरे, शेखर बंगाळे, सुभाष पाटील आदी उपस्थित होते.
या प्रकरणात प्रथम दर्शनी इंडियन ओव्हरसीज बँकेचे व्यवस्थापन दोषी असून मंजूर कर्ज प्रकरणात कायदेशीर कागदपत्रांवर आपल्या नावे झालेल्या सह्य़ा बनावट आहेत. कर्जाची रक्कम लोकमंगल बँकेकडे कशी हस्तांतरित झाली, याचेही कोडे आहे. तेव्हा बँकेसह लोकमंगल साखर कारखान्यावर फौजदारी कारवाई व्हावी, अशी मागणी शेख यांनी केली आहे.