मुंबई : लॉकडाऊनच्या काळात सर्वकाही ठप्प असल्यामुळे अनेक प्रश्न उद्भवत आहेत. त्यात घरभाड्याचाही (Housing Minister proposal about House rent ) समावेश आहे. त्यामुळेच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घरभाड्याबाबत एक प्रस्ताव राज्य सरकारसमोर ठेवला आहे. त्यानुसार घरमालकांनी भाडेकरुंना भाडे दिलं नाही म्हणून घराबाहेर काढू नये, तसंच किमान तीन महिने भाडेकरुंना वेळ द्यावा, असं या प्रस्तावात म्हटलं आहे. सध्या हा केवळ प्रस्ताव आहे, निर्णय झालेला नाही.
घरमालकांनी भाड्यासाठी तगादा लावू नये, माणुसकी दाखवून थोडासा दिलासा द्यावा हा त्यामागचा हेतू आहे, असं आव्हाडांनी म्हटलं आहे. पुढचा काळ कठीण आहे, संकटाच्या काळात गरिबांच्या मागे उभं राहणं आवश्यक आहे. गरिबांना त्रास होऊ नये ही सरकारची भावना आहे. महिनाभर घरात आहे, राहायचं काय, खायचं काय, हा प्रश्न गोरगरिबांना आहे. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने भाडेकरुंना दिलासा दिला, तर बरं होईल. तीन महिने भाडे पुढे ढकलावं, असं आवाहन आव्हाडांनी केलं आहे.