सोलापूर : अकोलेकाटी येथील बाळासाहेब लामकाने व सौ.शरावतीताई लामकाने यांच्या आर्थिक योगदानातून सरपंच भाऊसाहेब लामकाने, कुलदीप व कुलभूषण लामकाने यांच्या प्रेरणेतून ४०० विद्यार्थी तसेच शिक्षक व पालकांना सध्या सर्वत्र गाजत असलेला `तान्हाजी’ द अनसिंग वॉरिअर हा ऐतिहासिक चित्रपट सोलापुरातील भागवत चित्रपटगृहात दाखवण्यात आला.
चित्रपट पाहिल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. शूरवीर तानाजी मालुसरे यांच्या कार्याची अपरिचित बाजू समजल्याचे विद्यार्थ्यांनी आवर्जून सांगितले. चित्रपटातील थरार पाहून विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष करत छत्रपती शिवाजी महाराज,तानाजी मालुसरे,हर हर महादेव अशा घोषणा देत चित्रपटात रंगत आणली. हा चित्रपट विद्यार्थ्यांना मोफत दाखवल्याबद्दल तिन्ही शाळांच्या मुख्याध्यापकांनी बाळासाहेब लामकाने व त्यांचे कुटुंबिय तसेच सरपंच भाऊसाहेब लामकाने यांचे विषेश आभार मानले. या चित्रपटातून तानाजीचा पराक्रम पाहून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी त्यांच्यामध्ये देशाबद्दल प्रेम ,अभिमान जागृत व्हावा या उद्देशाने हा चित्रपट दाखवल्याचे बाळासाहेब लामकाने यांनी सांगितले.