अनुभवी रॉस टेलरचं धडाकेबाज शतक आणि त्याला हेन्री निकोलस व कर्णधार टॉम लॅथमने दिलेली भक्कम साथ या जोरावर न्यूझीलंडने भारतावर पहिल्या वन-डे सामन्यात मात केली आहे. ४ गडी राखून यजमान संघाने हा सामना जिंकला. भारताने विजयासाठी दिलेलं ३४८ धावांचं आव्हान न्यूझीलंडने सहज पूर्ण करत, या दौऱ्यातल्या आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या धावगतीवर अंकुश लावण्याचे प्रयत्न केले, मात्र त्यांचे प्रयत्न फोल ठरले. रॉस टेलरने नाबाद १०९ धावा केल्या.
मार्टीन गप्टील आणि हेन्री निकोलस यांनी संघाला भक्कम सुरुवात करुन दिली. पहिल्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी केल्यानंतर गप्टील माघारी परतला. यानंतर टॉम ब्लंडलला झटपट माघारी धाडण्यातही भारत यशस्वी ठरला. दुसऱ्या बाजूने हेन्री निकोलसने मात्र भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करत किल्ला लवढणं सुरु ठेवलं. निकोलस आणि कर्णधार लॅथम यांच्यात महत्वपूर्ण भागीदारीही झाली…मात्र विराटने दाखवलेल्या चपळाईमुळे निकोलस माघारी परतला, त्याने ७८ धावांची खेळी केली.
यानंतर टॉम लॅथम आणि रॉस टेलर यांनी महत्वपूर्ण भागीदारी रचत भारताच्या हातातून विजय हिसकावून घेतला कर्णधार टॉम लॅथमनेही यादरम्यान आपलं अर्धशतक पूर्ण केलं. विजयासाठी अवघ्या काही धावा शिल्लक असताना कर्णधार लॅथम कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला…मात्र रॉस टेलरने एक बाजू लावून धरत आपलं शतकही पूर्ण केलं. टी-२० मालिकेप्रमाणे चमत्कार करणं भारतीय गोलंदाजांना जमलं नाही, रॉस टेलरने तळातल्या फलंदाजांना हाती घेऊन संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.