मुंबई दि ५: मिशन बिगीन अगेन मध्ये राज्यात आपण उद्योग व्यवसाय सुरु केले आहेत. महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायांत हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरु करता येईल यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार केली असून ती लवकरच अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते आज राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकारी यांच्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये बोलत होते. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह सहभागी होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हॉटेल व्यवस्थापनांनी आपल्या कामगार व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नये असे सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले की मुंबई व शहरांतील सर्व हॉटेल्स या कोरोना युद्धात आमच्याबरोबर आहेत त्यासाठी त्यांचे अभिनंदन. पर्यटन व्यवसायातील महत्वाचा उद्योग असलेली हॉटेल्स तसेच लॉजेस सुरु करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल. आपली जबाबदारी दुहेरी आहे. हॉटेल्समध्ये येणारा प्रत्येक अभ्यागत, प्रवाशी निरोगी असेल यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी करावी लागेल कारण एक कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती हॉटेलमध्ये आला तरी सर्व हॉटेल व कर्मचारी आजारी पडू शकतात. आत्ता आत्ता आपण सलूनला परवानगी दिली आहे ती सुद्धा फक्त केस कापणे व हेअर डायसाठी. जिम देखील बंदच ठेवले आहे कारण आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे.
हॉटेल्स सुरु करायला काही अडचण नाही मात्र राज्य शासनाने आखून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे आपल्याला नियमांचे पालन करावे लागणार आहे. आज स्थानिक जे कामगार , कर्मचारी आपल्या हॉटेल्समध्ये आहेत त्यांना काढू नका. यात आपण काहीतरी मार्ग निश्चितपणे काढू, या संकट समयी कामगार संघटना देखील अवाजवी मागण्या करणार नाहीत असे मुख्यमंत्री म्हणाले.