येस न्युज मराठी नेटवर्क : महाराष्ट्रात करोनाचा पहिला रुग्ण आढळला त्याला आता १८० दिवस उलटले असून गेले असून राज्यातील करोना रुग्णांची संख्या देशात सर्वाधिक म्हणजे साडेआठ लाख एवढी झाली असताना अजूनही महाविकास आघाडी सरकार आरोग्य विभागाला पुरेसा निधी व हजारोंनी रिक्त असलेली डॉक्टर व अन्य आवश्यक पदे भरण्यास तयार नाही. आरोग्य विभागात आजच्या दिवशी डॉक्टरांसह तब्बल १७,३३७ पदे रिकामी असून करोनाच्या गेल्या सहा महिन्यात सरकार याबाबत पूर्ण उदासीनता बाळगून आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा, लातूर, उस्मानाबाद, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद, नांदेड, चंद्रपूर आदी राज्याच्या ग्रामीण भागात करोना पसरत चालला म्हणून मंत्री व राजकीय नेते अस्वस्थ होत असले तरी रोगावर योग्य ‘इलाज’ करायला ही मंडळी पुढाकार घ्यायला तयार नाहीत. आरोग्य विभागाला सकल राज्य उत्पन्नाच्या १ टक्का रक्कमही खर्च केली जात नसून अजूनही १९९१ च्या लोकसंख्येवर आधारित बृहत आराखड्यानुसार रुग्णालय उभारणी व एकूणच आरोग्य सेवेचे काम सुरु आहे. हे कमी म्हणून अत्यावश्यक सेवा मानल्या जाणाऱ्या आरोग्य विभागातील तब्बल १७,३३७ पदे भरण्यातच आलेली नाहीत. गेली अनेक वर्षे प्रत्येक अधिवेशनात प्रत्येक आरोग्यमंत्र्यांकडून ही पदे भरण्याची घोषणा करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात पदे भरलीच जात नाहीत. हे कमी म्हणून अत्यल्प पगारात तेही कंत्राटी पद्धतीने डॉक्टरांची पदे भरून आरोग्याचा कारभार हाकण्यावर भर देण्यात आला आहे. एकीकडे १७ हजार रिक्त पदे भरायची नाहीत तर दुसरीकडे सुमारे ३५ कंत्राटी डॉक्टर व अन्य कर्मचारी नेमून ग्रामीण आरोग्याचा कारभार हाकला जात आहे.