राज्यात करोनाचं संकट उद्भवलेलं आहे. राज्य सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अशात सरकारकडून तातडीनं निर्णय घेतले जात नाहीत. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांमध्ये समन्वय नसल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही भाजपा नेत्यांनी केला आहे. त्याचबरोबर राज्याचे राज्यपाल समांतर सरकार चालवण्याचा प्रयत्न करत असल्याचा मुद्दा शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमोर चर्चेदरम्यान उपस्थित केला होता. समांतर सरकार आणि भाजपा नेते या दोन्हींवर शिवसेनेनं तोफ डागली आहे.
शिवसेनेनं सामना अग्रलेखातून राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना टोले लगावत टीका केली आहे. ‘करोनाविरुद्धची लढाई साधी नाही. राज्यव्यवस्थेतील प्रत्येक घटक त्यात सहभागी झाला आहे. राष्ट्रपती भवनापासून पंतप्रधानांपर्यंत आणि मुख्यमंत्र्यांपासून राजभवनांपर्यंत प्रत्येकानेच या लढय़ात उतरायचे आहे. कोरोनाबरोबरच्या लढाईत आपले योगदान हवे असे सगळय़ांनाच वाटते. मग आमच्या राज्यपालांना तसे वाटले व त्यांनी राजभवनात बसून काही कार्य केले तर बिघडले कुठे? आम्ही म्हणतो करू द्या. राज्यपालांनी कोरोनासंदर्भात राजभवनात बसून प्रशासकीय यंत्रणा राबविली (परस्पर) म्हणून टीकेचा सूर उठला आहे. पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी संसदेतील सर्वपक्षीय नेत्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. त्यात महाराष्ट्रातील शिवसेनेसह सर्व नेत्यांनी स्पष्ट सांगितले की, या लढाईचे नेतृत्व पंतप्रधान मोदीच करतील. तेच सेनापती आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तम काम करीत असल्याची माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधानांना दिली.