नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला. आतापर्यंत गोळा केलेले पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. सीबीआयचे सहसंचालक मनोज शशिधर, डीआयजी गगनदीप गंभीर, एसपी नुपूर प्रसाद, आणि डीएसपी अनिल कुमार यादव अशी सीबीआयची टीम उद्या महाराष्ट्रात दाखल होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आज (19 ऑगस्ट) दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालात सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवली. 6 ऑगस्टला एफआयआर नोंदवल्यानंतर सीबीआयने या प्रकरणात विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय मानले जाणारे गुजरात कॅडरचे आयपीएस अधिकारी मनोज शशिधर हे सीबीआय पथकाचे प्रमुख असतील.
महिला आरोपींची चौकशी करण्यात अडचण उद्भवू नये म्हणून गगनदीप गंभीर आणि नुपूर प्रसाद यांनाही चार सदस्यीय एसआयटी पथकात समाविष्ट करण्यात आले आहे. अनिल यादव हे तपास अधिकारी असतील.