सोलापूर : जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासनाने मिशन मोडवर काम करावे. शहरात लोकसंख्या जास्त असल्याने मनुष्यबळ कमी पडत असेल तर ग्रामीण टीमसोबत सर्वेक्षण तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या. स्थलांतरित कामगारांसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हेल्थ डेस्क स्थापन करण्याच्या सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या.
खरीप हंगाम, पीक कर्ज वाटप आणि कोरोनाच्या स्थितीचा आढावा डॉ. म्हैसेकर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला, त्याप्रसंगी त्यांनी सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, राष्ट्रीय बँकांचे प्रतिनिधी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक शैलेश कोथमिरे यांच्यासह संबंधित विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
डॉ. म्हैसेकर म्हणाले की, जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांनी खरीप हंगामात शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, यात कर्जमाफी न झालेल्या व झालेल्या सर्वांचा समावेश करा. काही बँका कर्ज देत नसतील तर यात जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. कोथमिरे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्थिती सांगितली. निधी नसल्याने नाबार्डकडे मागणी केली असून नियमित कर्ज भरणाऱ्यांना पुन्हा कर्ज देत असून आतापर्यंत 59 टक्के पीक कर्ज वाटप झाल्याचे सांगितले.
शंभरकर यांनी कोरोनाची स्थिती मांडली. जिल्ह्यात आतापर्यंत 1897 कोरोना रूग्ण, यातील 971 रूग्ण बरे होऊन घरी गेले तर 772 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात 170 रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला, यात शहरातील 159 तर 11 ग्रामीण रूग्णांचा समावेश आहे. डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले की, कोरोना रूग्णांचा डाटा भरताना काळजी घ्या. जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. विडी, वस्त्रोद्योग क्षेत्रातील कामगारांची संपूर्ण माहिती वय, आजारासह गोळा करा. तंबाखू आणि टेक्स्टाईलचा रूग्णांवर काय परिणाम होतोय का, मृत्यूंची कारणे काय, याबाबत संशोधन करा. यावर डॉ. ठाकूर यांनी रूग्णांवर व परिसरातील नागरिकांवर परिणाम होत असल्याचे सांगितले. कोरोना रूग्णांमध्ये 53 विडी कामगार तर 30 टेक्स्टाईल कामगार आहेत.
यावर डॉ. म्हैसेकर यांनी ग्रामीण टीमसह नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी यांच्या सहाय्याने शहरातील सर्वेक्षणचे काम करा. सध्या शरीराच्या तापमानाबरोबर पल्स रेट, एक्स-रे, रक्तदाब यांचीही तपासणी करा, अशा सूचना दिल्या.