येस न्युज मराठी नेटवर्क : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते इंदू मिलवरील जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर या सोहळ्यासाठी फक्त १६ जणांनाच निमंत्रण देण्यात आलं आहे. बाबासाहेबांचे पणतू आनंदराज आंबेडकर यांना कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र निमंत्रण नसल्याने प्रकाश आंबेडकर तसंच भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दुपारी साडेतीन वाजता पायाभरणीचा कार्यक्रम पार पडणार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी निमंत्रण कोणाला द्यायचं, कोणाला नाही हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे असं प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. “राज्य सरकार तीन पक्षांचं आहे. मुख्यमंत्री स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात का?,” अशी विचारणा यावेळी त्यांनी केली. कार्यक्रमाचं आमंत्रण दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्षनेत्यांनाही देण्यात आलेलं नाही. यावरुन प्रवीण दरेकर यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, आदित्य ठाकरे, असलम शेख, महापौर, स्थानिक आमदार, नगरसेवक आणि अधिकारी कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहे.
- इंदू मिल स्मारकात ४५० फूट उंचीचा डॉ. आंबेडकरांचा पुतळा
इंदू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय भव्य आंबेडकर स्मारक उभारण्याचा २०१३ मध्ये निर्णय घेण्यात आला. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास (एमएमआरडीए) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून मान्यता देण्यात आली. २०१८ मध्ये या स्मारकाचा खर्च ७६३ कोटी ५ लाख रुपये इतका निश्चित करण्यात आला होता. जुलैमध्ये कामाचा आढावा घेऊन अंदाजे १०८९ कोटी ९५ लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. त्यानुसार दोन वर्षांत ३२६ कोटी ९० लाख रुपयांची वाढ झाली आहे. या स्मारकात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची ४५० फूट करण्याचा प्रस्ताव होता. राज्य शासनाने त्याला मान्यता दिली आहे.