भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण
नागपूर : मातृभूमी, मातृभाषा आणि माता या तीन बाबी सर्वश्रेष्ठ असून सर्वांनी जाणीवपूर्वक मातृभाषेचा अंगीकार करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज येथे केले. कोराडी येथे भारतीय विद्या भवनतर्फे उभारण्यात आलेले सांस्कृतिक केंद्र भारतीय संस्कृतीतील श्रेष्ठ जीवन मूल्यांचा परिचय करून देण्यात महत्वाची भूमिका बजावेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्राचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, भारतीय विद्याभवन संस्थेचे पदाधिकारी जगदीश लखाणी, राजेंद्र पुरोहित आणि श्रीमती अन्नपूर्णी शास्त्री यावेळी उपस्थित होते.
भारताला अध्यात्म, संस्कृती आणि स्वातंत्र्याचा गौरवशाली इतिहास आहे, भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्रात ही भारतीय मूल्ये प्रभावीपणे प्रदर्शित करण्यात आली आहेत. रामायण आणि भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास सचित्र रुपात मांडणाऱ्या या केंद्राच्या माध्यमातून युवा पिढीला भारतीय संस्कृतीशी जोडण्याचे महत्वपूर्ण कार्य होईल, असेही राष्ट्रपतींनी सांगितले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये भारतीय संस्कृती आणि स्वातंत्र्याचा जाज्ज्वल्य इतिहास युवा पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी या केंद्राचा प्रारंभ औचित्यपूर्ण ठरला आहे. विद्याभवन सांस्कृतिक केंद्रामध्ये रामायणातील प्रसंग जीवनमूल्ये प्रतिबिंबित करणारी आहेत. रामायणाने भारतीय संस्कृतीला नात्यातील आदर्श जपण्याचा संदेश दिला आहे. केंद्रातील रामायणाचे सचित्र सादरीकरण युवा पिढीला भारतीय संस्कृतीशी जोडण्याचे कार्य करेल. या सांस्कृतिक केंद्रात साकारलेल्या रामायणाच्या प्रसंगातून प्रभू रामांच्या आयुष्यातील जीवन मूल्यांची निष्ठा आणि संघर्ष सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे सांगून राष्ट्रपतींनी संस्कारक्षम मुल्यांच्या प्रसार- प्रचारात भारतीय विद्या भवन संस्थेने दिलेल्या योगदानाचा तसेच बनवारीलाल पुरोहित यांच्या अथक परिश्रमांचाही गौरव केला.
देश-विदेशातील जनतेसाठी प्रेरणादायी – राज्यपाल रमेश बैस
भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्राद्वारे रामायणातील मूल्ये आणि देशभक्तीची प्रेरणा मिळेल. रामायण महाकाव्य हे हिंदी, मराठी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये मांडण्यात आल्याने जगभरातील जनतेला यातील संदेश प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास राज्यपाल श्री. बैस यांनी व्यक्त केला. महाकाव्य रामायण हे सामाजिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही अंगांनी श्रेष्ठ कलाकृती असून ती मानवी समाजाला कायम मार्गदर्शक आहे. सांस्कृतिक भावनातील क्रांतिकारकांना वाहिलेले दालन ही भारतीय स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या वीर क्रांतीकारकांना आदरांजली ठरेल, असेही राज्यपाल म्हणाले.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे सांस्कृतिक केंद्र – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
रामायणाद्वारे अध्यात्मिक प्रेरणा आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या सादरीकरणातून देशभक्तीची प्रेरणा देणारे हे सांस्कृतिक केंद्र आहे. या केंद्राची मांडणी व सादरीकरण अत्यंत सुबक व उत्कृष्ट झाले असून हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे केंद्र ठरेल आणि नागपूरच्या वैभवात भर घालेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. भारत आणि भारताबाहेरूनही लोक या केंद्राला भेट देतील आणि इथून प्रेरणा घेऊन जातील, असेही मंत्री श्री.गडकरी म्हणाले. या केंद्राच्या माध्यमातून अध्यात्मिकतेशी देशाचा इतिहास जोडण्यात आला आहे. इतिहास, संस्कृती आणि वारसा ही आपली बलस्थाने आहेत, त्याचे प्रतिबिंब या केंद्राच्या माध्यमातून प्रभावीपणे साकारण्यात आले आहे.
महाराष्ट्राला सांस्कृतिक भवनाची अमूल्य भेट – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
रामायण हे भारतीय सांस्कृतिक मूल्यांचे महाकाव्य आहे. भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्रात मांडण्यात आलेले सचित्र स्वरूपातील रामायण येथे भेट देणाऱ्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील विविध प्रसंगांचे सादरीकरणही येथे करण्यात आले आहे. भारताची गौरवशाली संस्कृती व इतिहास नव्या पिढीसमोर मांडण्याचे महत्त्वपूर्ण आणि स्तुत्य कार्य या केंद्राद्वारे झाले आहे. त्या माध्यमातून भावी पिढीला निश्चितच प्रेरणा मिळेल. महाराष्ट्राला ही मोठी भेट असल्याचे गौरवोद्गार श्री. फडणवीस यांनी काढले.या सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले, ही एक ऐतिहासिक घटना असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारतीय संस्कृतीचे संवर्धन करणार – पुरोहित
स्वागतपर भाषणात पंजाबचे राज्यपाल तथा भारतीय विद्या भवनचे विश्वस्त बनवारीलाल पुरोहित म्हणाले, चार वर्षांच्या अथक परिश्रमातून उभी राहिलेली भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्राची इमारत भारतीय संस्कृतीचे संवर्धन व प्रचार प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडेल. या केंद्राद्वारे विदर्भ, महाराष्ट्र व भारतात भारतीय संस्कृती व स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली ठेवा जनतेसमोर मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी, राष्ट्रपतींनी या परिसरात आगमन झाल्यानंतर महालक्ष्मी जगदंबा मंदिरात दर्शन घेतले आणि आरती केली. तसेच राष्ट्रपतींनी विद्या भवनाच्या सांस्कृतिक केंद्राची लोकार्पण पूर्व पाहणी केली. हे सांस्कृतिक केंद्र 8 जुलै 2023 पासून सर्वांसाठी दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुले राहणार आहे.