येस न्युज मराठी नेटवर्क :जगभरामध्ये कारोना व्हायरसचा फैलाव होत असताना सोशल मीडियावर एक नवे अफवांचे पीक आले आहे. मांसाहार केल्यामुळे कोरोना व्हायरस ची लागण होऊ शकते, या अफवे मुळे कुक्कुटपालन क्षेत्राची आणि शेतकऱ्यांचे सुद्धा प्रचंड नुकसान झाले आहे. जगभरामध्ये थैमान घातलेला कारोना वायरसपासून बचाव करण्यासाठी महाराष्ट्रात केलेल्या उपाययोजनांबाबत नितीन पवार, संजय पोतनीस आणि इतर आमदारांनी विधानसभेमध्ये लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
या प्रश्नाला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी उत्तर दिलं. “वायरस टाळण्यासाठी मांसाहार करू नये वगैरे सारख्या अफवांचे खंडण त्यांनी केलं. आरोग्य विभागातर्फे सुद्धा याबाबत कळवण्यात आले आहे आणि मी स्वतः सुद्धा याबाबत मीडियाशी बोललो आहे,” असं त्यांनी सभागृहाला सांगितले. मात्र कच्चे मांस खाऊ नये आणि खोकताना किंवा शिंकताना तोंडाला रुमाल लावावा, असं त्यांनी सांगितले. सध्या देशात आणि महाराष्ट्रात कारोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे भयभीत होण्याचे कुठलेही कारण नाही, असं टोपे यांनी नमूद केले.