सोलापूर- भाषा ही फार महत्त्वाची असून विचार करण्याचे प्रमुख साधन आहे. ज्ञानाची निर्मिती भाषेतूनच होते. प्रगतीसाठी भाषा प्रभावी माध्यम आहे. आपली मायबोली मराठी भाषा ही महान असून या भाषेवरच आपल्या अस्सल मराठीमोळ्या संस्कृतींचे अस्तित्व आहे. त्यामुळे मराठी संस्कृती टिकवण्यासाठी व मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी सर्वांनी मराठी भाषेचा विकास करावा, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. कृष्णा इंगोले यांनी केले.
गुरुवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या मराठी भाषा दिनानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. इंगोले यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक तथा लेखक डॉ. नरेंद्र कुंटे यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर कुलसचिव डॉ. विकास घुटे, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विकास कदम, सामाजिकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. दत्ता घोलप यांनी केले.
डॉ. इंगोले म्हणाले की, मानवी जीवनात भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्यात मातृभाषेला अधिक महत्त्व आहे. मानवी प्रगती ही भाषेवरच अवलंबून असते. मराठी लोकसाहित्य हे भाषेचे मूळ माध्यम आहे. मराठी लोकसाहित्यामध्ये जात्यावरची गाणी, स्त्रियांची गाणी, गवळण, गोंधळ, भारुड, कीर्तन आदी साहित्य प्रकारांचा समावेश होतो. या लोकसहित्यामधूनच मराठी भाषेचा विकास होत आला आहे. या लोकसाहित्याचे भाषेवर सांस्कृतिक वर्चस्व आहे. यामुळेच मराठी भाषा ही विकसित होत गेली आणि ती आता ज्ञानभाषा होण्यासाठी सर्वांनी आपले योगदान देणे आवश्यक असल्याचे मत डॉ. इंगोले यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी डॉ. कुंटे यांनी विद्यापीठात भाषा संकुल सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त करीत कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या कार्याचे मुक्तकंठाने प्रशंसा केली. यावेळी त्यांनी आपल्या संतसाहित्यावरील अभ्यासाच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी त्यांची काही पुस्तके विद्यापीठास भेट दिली.
कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की, भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक असून त्या जोरावरच आपण प्रत्येक क्षेत्रात प्रगती करू शकतो. आज डिजिटल स्वरूपात मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती होत आहे, ही आनंदाची बाब आहे. या साहित्याचा अभ्यास करत व विश्लेषण करत मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मराठी भाषा दिनानिमित्त विद्यापीठात निमंत्रित कवी संमेलन पार पडले. या कविसंमेलनात कवी इंद्रजित घुले, नारायण लाळे, आबा पाटील आणि डॉ. स्मिता पाटील यांचा समावेश होता. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ‘लोकसाहित्य- उत्सव मराठीचा’ या संकल्पने अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील निमंत्रित लोककलावंतांच्या कलेचे सादरीकरण झाले.
या कार्यक्रमास राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. महेश माने, ॲड नीता मंकणी, डॉ. भगवान आदटराव यांच्यासह विविध प्राधिकरणाचे सदस्य, अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली यांनी केले तर आभार सागर सुरवसे यांनी मानले.