सोलापूर : तालुक्याच्या विकासाकरिता गावातील सर्व लोकांनी सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून एकत्र येऊन कार्य करावे. गावातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र दामाजी मंदिर, ज्वारीचे कोठार असणारी शेती याचे मार्केटिंग करण्याचे कार्य करण्यात येईल. युवकांना व्यवसाय मार्गदर्शनासोबत आर्थिक सहाय्य, गरीब मुलींना शिक्षणासाठी सहाय्य, दुष्काळावर मात करण्यासाठी वृक्ष लागवड आदी उपक्रम राबवून मंगळवेढा तालुका जिल्ह्यात अग्रस्थानावर आणण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन माजी सहकार मंत्री तथा आ. सुभाष देशमुख यांनी केले.
मंगळवेढा येथील इंग्लिश स्कूल व कॉलेजमध्ये मंगळवारी सोलापूर सोशल फाउंडेशनच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत स्पर्धा परीक्षा मोफत अभ्यासिकाचे उद्घाटन व स्नेहसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, याच्या उद्घाटनप्रसंगी आ. देशमुख बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सिद्धेश्वर मोगले, राजेंद्र सुरवसे, तेजस्विनी कदम, अंकुश पडवले, श्रीधर भोसले, येताळ भगत, अशोक माळी, सत्यजित सुरवसे, सोमनाथ अवताडे, दामोदर देशमुख आदीसंह मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी पुणे, मुंबई व इतर ठिकाणी जाऊ शकत नाहीत व त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी मंगळवेढ्यात स्पर्धा परीक्षा मोफत अभ्यासिका सुरू करण्यात आल्याचे फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी फाउंडेशनचे मुख्य समन्वयक दत्तात्रय चौगुले, विजय कुचेकर, विपुल लावंड उपस्थित होते.