सोलापूर : श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रत्येक महिन्याला वारी निमित्ताने लाखो वारकरी येतात. वारी हा त्यांचा प्राण आहे. “पंढरीची वारी आहे माझे घरी | आणिक न करी तीर्थ व्रत || ” “देह जावो अथवा राहो |” या विचाराने वारी करतात. त्यामुळे आषाढी वारीला निष्ठावान वारकरी नित्यनेम पूर्ण करणेसाठी पंढरपूरला येतील त्यांना नगर प्रदक्षिणा करणेसाठी शासनाने अधिकृत परवानगी देऊन सहकार्य करावे. परवानगी न घेता वारकरी पंढरपूरला आले आणि शासन प्रतिबंध करू लागल्या नंतर अनर्थ घडला तर त्याला सर्वस्वी जबाबदार शासन व अधिकारी असतील.
तसेच भारतातील सर्व मंदिर दर्शनाला खुले केले आहेत, बाजार पेठ खुली केली आहे. सर्वजण कुठे ही ये जा करू शकतात. तर पंढरपूर श्री विठ्ठल मंदिर बंद का ठेवले आहे. नियम व अटी घालून तेही सुरु करण्यात यावे. असे निवेदन ह भ प प्रकाश महाराज बोधले (राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ )यांचे मार्गदर्शनाने कार्यरत असलेल्या अखिल भारतीय वारकरी मंडळ यांचे वतीने मा मुख्यमंत्री महोदय यांना ईमेल द्वारे दिले आहे.
भारतातील सर्व प्रार्थना स्थळ, मंदिर, मशीद इ. सुरु केले आहेत. तर मंदिर बंद का ठेवले आहे. हा वारकरी परंपरेवर अन्याय आहे.केवळ पंढरपूर -वारकरी डोळ्यासमोर ठेऊन घेतलेला निर्णय आहे असे वाटते. हे सहन केले जाणार नाही. त्यामुळे मंदिर दर्शन खुले करावे, लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही विनंती अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल असे निवेदन ह भ प सुधाकर महाराज इंगळे (प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ ) ह भ प जोतिराम चांगभले (जिल्हा अध्यक्ष) ह भ प संजय पवार (शहर अध्यक्ष) व सर्व पदाधिकारी यांनी दिले.