- सुनील कामाठी यांना अखेर पत्नीसह अटक
सोलापूर : अशोक चौकातील एका इमारतीच्या आडोशाला अवैधरित्या मटका बुकीचा व्यवसाय चालविणारा भाजपचा नगरसेवक सुनिल कामाठी आणि त्यांच्या पत्नी सुनीता कामाठी यांना सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेकडून हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे. कामाठी यांनी जून २०१७ ते ऑगस्ट २०२० या तीन वर्षाच्या कालावधीत ३०७ कोटींचा व्यवसाय केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
२४ ऑगस्ट रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामाठी चालवीत असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारला होता. यामध्ये आजवर २८८ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून ७९ जणांना अटक करण्यात आली आहे. गुप्तहेरांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेचे पथक आंध्र प्रदेशात पोहचले. त्याची कूणकूण लागताच विजयवाडा येथून हैदराबादकडे पळून जाताना पोलिसांनी कामाठीला पत्नी सुनीता कामाठीसह पहाटे साडेतीन वाजता अटक केली.
न्यू पाच्छा पेठे कोंची कोरवी गल्ली येथील राजभूलक्ष्मी इमारतीत 24 ऑगस्टला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकली. त्यावेळी काहीजण पळून गेले, तर एकाचा इमारतीवरुन पडल्याने मृत्यू झाला. या अवैध व्यवसायाचा मुख्य सूत्रधार भाजपचा नगरसेवक सुनिल कामाठी पोलिसांना चकवा देऊन पळून जाण्यात यशस्वी ठरला. मात्र, पोलिसांनी त्याच्याबद्दलची माहिती त्याची पत्नी व आकाश कामाठी याच्या आईकडून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्या दिवशी चौकशीला हजर न राहताच त्या दोघींनीही पलायन केले. त्यानंतर कामाठी पोलिसांत हजर राहत नसल्याने त्याची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरु झाली. दरम्यान, गुप्तहेरांकडून कामाठी आंध्र प्रदेशात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता 26 स्पटेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली.